top of page

पू. बाबांची वाणी

IMG_0179.JPG

पू. बाबा म्हणजे श्रीकृष्ण प्रेमात विरून गेलेले भक्त शिरोमणी!! त्यांच्या मुख़ातून स्त्रवलेली दिव्यामृतधारा म्हणजे सदगुरूकृपा वैभवाचे अमर चैतन्योपनिषद! प्रवचनाच्या दरम्यान पू. बाबांच्या स्वरात निर्मळपणा व करुणेचा आर्तभाव असे. योग शास्त्रात अशा स्वराला सुषुम्ना स्वर असे म्हणतात. प्रवचने श्रोत्यांच्या अंगावर रोमांच उभी करणा-या संबोधनवाचक शब्दांनी असे. सर्व जीवनच हाती घेणारा असा हा वक्ता होता!​

पू. बाबांच्या प्रत्येक शब्दाला विलक्षण तेज व धार असे. त्यांच्या वकृत्वाचा थाट व मांडणी विलक्षण असे व ती मांडत असताना त्यांच्या चेह-यावर अशी काही तेजस्विता व अलौकिकता विलसत असे की सर्वजण मोहनास्त्र सोडल्याप्रमाणे मंत्रमुग्ध होत. पू. बाबा बोलत असताना उपनिषदकालीन ऋषिप्रमाणे भासत. सहज आसन, सरळ, ताठ मानेचा कणा, गंभीर तत्वज्ञ चेहरा, तेजस्वी डोळे, आश्वासक स्वर, शब्दांची फेक सहज पण अपेक्षित परिणाम साधणारी असे. स्वराला एक मोहक नाद असे.

 

पुस्तकी ज्ञानापेक्षा जीवजगत ज्ञानाचा संदेहशून्य आविष्कार त्यांच्या वाणीत असे. स्वयंसत्याची उत्स्फूर्त मांडणी त्यांच्या प्रवचनांमध्ये असे. त्यांचे विवेचन इतके मूलभूत, आत्मीयत्वपूर्ण, रसाळ, व हृदयस्पर्शी असे की काळाची गती थांबल्यासारखी वाटे. बाह्य जगाचा श्रोत्यांना सहज विसर पडे. त्यांचे डोळे मिटले जात. अंतरंगात काहीतरी अदभूत, अत्यंत मधुर, चित्तप्रत्ययी अशा संवेदनांच्या लाटा उठत.

 

पू. बाबांच्या वाणीचा वेग, ओघ आणि आवेग प्रचंड असे. शब्दसृष्टिलाही ईश्वर असतो, त्या शब्देश्वराचे दर्शन त्यांच्या वाणीतून घडे. प्रवचनांच्याच समयी नव्हे तर त्यांची सारी वाणीच प्रवचनमय असायची. खाताना, पिताना, चालताना, चर्चा करताना अथवा अन्यत्रही पू. बाबा जे बोलत ते सारेच बोधमय आणि उपदेशमय असे. विषय कोणताही व कसाही असो, त्यातून पू. बाबांचा धर्मनिनाद गर्जून उठत असे.

 

त्यांचे चिंतन चैतन्यशील असल्याने त्यांच्या वाणीला अमृतस्पर्श असायचा. श्रोत्यांना आकर्षून घेण्याची शक्ती पू. बाबांमध्ये विलक्षण होती. ते म्हणत की या प्रवचनात मी प्रत्येकाला काहीना काही दिले आहे. प्रवचनानंतर श्रोते परतताना आनंदी, स्वानंदी आणि काहीतर परमानंदी असत. देववाणी याशिवाय वेगळी असत नाही.​​​​

Terms & Conditions

Privacy Policy

Accessibility Statement

©2035 by Shashwat Sangati. Powered and secured by Wix

bottom of page