स्वात्मदीक्षा
धार्मिक* आचारांच्या जगात प्रवेशण्यापूर्वी अंतःकरणात परमार्थ विचारांचे जागरण होणे आवश्यक आहे. जीवन धर्ममय होण्यासाठी, परमार्थाच्या मंदिराचा विशाल रव करणारा तत्त्व-निनाद, प्रत्येक भावुकाने प्रथम ध्यानी घेणे उचित असते. असे न घडेल तर शक्य आहे की तुम्ही, "केवळ आचार - निष्ठेचे संकुचित स्तोम करणे हाच धर्म होय." असे समजण्याची परंपरानुगत चूक पुनश्च कराल. तरी अध्यात्म विवेकाने अंतरंग जागवा व मग पुढील आचाराने सारे जीवन विशाल व पावन करा. यासाठीच 'स्वात्मदीक्षा' प्रयोग आहे.
(प. पू. बाबामहाराज आर्वीकर यांच्या 'आचार संहिता' मधून)
*पू. बाबा म्हणतात, "धर्म हे एक जीवन विज्ञान आहे. स्थिरचराच्या संबंधातून असणे, राहणे व वागणे याची व्यवस्थाच धर्म सांगतो. मानवीसृष्टी व मानवेतर जीवन रचना यांच्या उत्क्रांतीचा विचार धर्मात आहे. हाच संतधर्म, ईशधर्म किंवा आत्मधर्म होय."
प्रयोग प्रक्रिया
साधकाने प्रतिदिन सकाळी स्नानोत्तर करावयाचा 'स्वात्मदीक्षा' प्रयोग की, जो स्वात्मोपदेश अशा स्वरूपाचा आहे.
१)
सकाळी स्नान झाल्यावर आसनावर जरा वेळ स्वस्थ बसा.
२)
नंतर नामस्मरण सुरू करा.
३)
थोड्या वेळाने नामस्मरण सुरू आहे असा केवळ भाव करा व नामस्मरण करणे थांबवा. या भावाने स्मरणाचा भूतसंस्कार जागा होईल व स्मरण आतच होत असल्याचा भास होईल.
४)
नंतर स्मरण फक्तच ऐका.
५)
ते स्पष्ट होऊ लागले म्हणजे घडणारे स्मरण कोठे होते व कोण करतो हे स्मरणाच्या गतीने स्वस्थ होऊन शोधा.
असे होणे कठीण नाही. उलट ते अत्यंत सहज आहे. असे तुम्ही शोधू लागलात म्हणजे श्वासगती मंद झाल्याचे तुम्हास कळेल. पुढे ध्यानस्थिती येऊन वृत्तींचा लय होऊन स्थूल देहाची विस्मृती होईल पण तुम्ही मात्र जागे रहाल. याच वेळी बुध्दी व मन अगदीच जवळ व एकसंवेद्य असतात. अशा वेळी तेथे पुढील विचार- स्पंद जागवा.
१) हे प्रभो ! माझे सर्व सुख आहे. मी आनंदपूर्ण आहे.
२) हे प्रभो ! मला सर्वच हितकारी व मित्रत्वाचे आहेत.
३) हे प्रभो ! कोणाच्याही संबंधात निंदात्मक भाषण मला घडवू नको.
४) हे प्रभो ! सर्वांविषयी मला प्रेम व निष्कपट मन दे.
५) हे प्रभो! सर्वत्र तुझ्या स्वरूपाचाच सोहळा माझे डोळे पाहोत.
६) हे दयाघना ! सर्व स्पर्शात तुझाच मधुर स्पर्श मला लाभो.
७) हे नियंत्या ! माझी इंद्रिये तुझ्या पवित्र संगाने पुनीत होवोत.
८) हे दिव्यधना ! माझ्या बुध्दीत तुझेच सुखमय स्मरण असो.
९) हे पुराणपुरूषा ! तुझ्या कृपेने माझे प्रत्येक कर्म सकळांचे हित करो.
१०) हे जनार्दना ! माझा प्रत्येक क्षण तुझ्या प्रेमाने शुद्ध, उपकारक होऊन सत्य संकल्पात क्रियाशील असो.
११) हे वरदानी जगदात्म्या! सारे विश्व आनंदी, मंगल व उर्ध्वगामी राहो. एवढे या याचकास वरदान दे.
वरील शुद्धतम विचार-स्पंदांनी त्या क्षणी बुद्धीला चेतित करा. म्हणजे थोड्याच दिवसात तुमचा संकल्प सिद्ध होऊन दिव्यता व शांती प्राप्त झाल्याचा आनंद तुम्ही अनुभवाल. कारण याच वेळी बुद्धी ही आपल्या मूळ शक्तीने प्रतिष्ठित असते की, ज्यामुळे त्या वेळच्या या उपदेशाने स्वभाव निर्माण करण्याचे घडते. यालाच 'स्वात्मदीक्षा' विधी म्हणतात.