सायं प्रार्थना
प्रार्थनेचे रहस्य - पू. बाबामहाराज यांच्या शब्दांत:
हृदयाचा अंतर्गत प्रदेश स्थिर व्हावा, परमेश्वराचे स्मरण, भजन घडावे यासाठी प्रार्थना आहे. प्रार्थना करीत असताना सर्वव्यापक परमेश्वराला आपण का आळवतो हे कळण्यासाठी, प्रार्थनेत हृदय ओतले पाहिजे. त्यांसाठी काही संकेत हृदयात असावा. चितशक्तीचा आविष्कार व्हावा असा संकेत असावा. पोराच्या हाकेतील करुण हृदय आपल्यात असावे. त्यामुळे विकास होऊ शकेल. प्रेमपूर्ण निरामयता असल्यास परमेश्वराची अनुभूती येऊ लागेल. प्रार्थना हृदपटलावरील विक्षेप, आवरण दूर करते. अशी प्रार्थना झाली पाहिजे. प्रार्थना करणे नसून प्रार्थना झाली पाहिजे. प्रार्थनेत स्वाभाविक आविष्कार झाला पाहिजे. नाहीतर प्रभूचा संकेत कळणे कठीण ! परमेश्वराच्या संकेताची हाक आपल्या हृदयाच्या पवित्रपणाकरताच आहे. हृदय निर्मळ करणे हेच ध्येय असावे. प्रार्थनेमुळे विश्वातील अणूपरमाणूत व्याप्त असलेल्या परमेश्वराच्या अस्तित्वाविषयी, सर्व जीवांविषयी कळकळ निर्माण झाली पाहिजे. परमेश्वरीय अर्थ परमेश्वराच्याच कृपेने प्रार्थनेने प्राप्त होतो. सर्व हृदयांचे एकत्व प्रार्थनेतून होऊ शकेल. निकृष्ठ मन बदलून ते पवित्र व बलवान करण्याचे कार्य प्रार्थनेने होईल. परमेश्वराला आपल्या मनात स्थिर करण्यासाठी व त्याची शक्ती आपल्यात निर्माण होण्याकरीता प्रार्थना करावी.
प्रार्थना करताना मला जो आनंद होतो व जे अनुभव मी करतो, तेच या प्रार्थनेव्दारे सर्वांना येतील, असा श्रीगुरुदेवांचा माझेकडे आर्शीवाद आहे. म्हणून मी विश्वासाने आश्वासन देतो की ह्या प्रार्थनेव्दारे प्रत्येक पारमार्थिक जीव, उच्चतम आनंदाचा स्वगत अनुभव श्रीगुरुप्रसादे मिळवू शकतो. अर्थात श्रीगुरु ही देवता, सकळांचे प्राकट्य गुरुत्वाने योग्य वेळी स्वीकारेल. म्हणून ही प्रार्थना सर्वमंगलकारक आहे.