शिष्यस्तेऽहं शाधि मां त्वां प्रपन्नम्.
- shashwatsangati
- Apr 16
- 2 min read
लेखक: पू. बाबामहाराज आर्वीकर

शरण हा शब्द सर्व गीतेचं एक सार आहे. शरण याचा अर्थ आहे 'लीन'. शरण याचा अर्थ एखाद्या व्यक्तित्वाला, एखाद्या स्थानाला लोटांगण घालणे असा नाही. धर्मशास्त्राच्या किंवा एकंदर भक्तिशास्त्राच्या अपेक्षेमध्ये खूप गैरसमज आज पसरलेले आहेत. शरणता याचा अर्थ आहे आपल्या मूळ अवस्थेमध्ये लीन होणे. शरणता हा विषय अत्यंत गंभीर आणि सखोल संवेदनेचा असा विषय आहे. साष्टांग नमस्कार केला म्हणजे शरण होत नाही किंबहुना मी आपल्याला शरण आलो आहे, मला काहीतरी एकंदर सांगा असं म्हटलं म्हणजे शरण्य होत नाही. मग शरण्य म्हणजे काय ? आपली अवस्था प्रथम आपण स्पष्ट केली पाहिजे. आपली अवस्था म्हणजे तो आत्मनिक्षीत झाला. शरण होण्याचा अधिकार आहे. शरण त्याला होता येते की ज्याने आपले मन तपासलं, शोधलं. आपल्या अंतर्गत अवस्थेतल्या दोषांचं जाळं त्याने उलगडलं आहे आणि ते सर्व दोष स्पष्ट सूर्यासारखे त्याच्या समोर उघड झालेले आहेत. तो पुरुष शेवटी अशांनाच शरण जातो की जे हे जाळं तोडू शकतात. म्हणून कार्पण्यदोष अर्जुनाला समजला. हा कशामुळे निर्माण झाला हेही समजलं. धर्मसम्मूढ आपण झालो आहोत आणि त्याचबरोबर त्याला हेही कळलं की निःश्रेयसाची आपली इच्छा आहे, पण आपण अडकलो आहोत. ह्या सर्व गोष्टी जेव्हा त्याला समजतात, (आत्मनिक्षीत होऊन) त्या वेळेला तो म्हणतो की मला धर्मसम्मूढतेमुळे निःश्रेयसाकडे जाता येत नाही आणि यामुळे मी तुला शरण आलो. मी काय करायचं आहे हे तू सांग. या प्रकारचं विवेचन ऐकल्यावर मग मात्र श्रीकृष्ण त्याला आशीर्वाद देतात. गीतेवर जो आरोप आपण करतो की, गीतेत श्रीकृष्णांनी अर्जुनाच्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही तो एवढ्याच करता खोटा म्हणावा लागतो की अर्जुनाच्या अवस्थेचं निराकरण त्यांनी केलेलं आहे आणि अर्जुनाने त्याची कबुली अठराव्या अध्यायाच्या शेवटी दिलेली आहे.
“नष्टो मोहः स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान्मयाच्युत" ही त्याची एकंदर कबुली आहे, आणि "स्थितोऽस्मिगतसन्देहः" आणि मग म्हणतो "करिष्ये वचनं तव."
भारतवर्षामधली ही महानता आहे. जेव्हा एखादी गोष्ट आम्ही मान्य करतो त्या वेळेला संपूर्ण अहंकार आणि आढ्यता आमची दूर जाते. त्याच वेळेला ज्या माणसाचं ऐकण्याची आम्ही कबुली देतो, तो मनुष्यसुद्धा असा बहादूर असतो, तो असं म्हणतो की, जर माझं हे तुला पटलं असेल तर "यथेच्छसि तथा कुरु" तू कसाही वाग. इतकं बौद्धिक स्वातंत्र्य भारतीय संस्कृतीत आहे, भारतीय धर्मात आहे. बुद्धी गुलाम करण्याचा आखाडा म्हणजे धर्म नव्हे. तो परराष्ट्रात आहे. आज आम्ही पाहतो, अनेक धर्मामध्ये वास्तविक अनेक राष्ट्रांच्या एकंदर धार्मिक वेदनेमध्ये मानवी बुद्धी आणि मन गुलाम करणं या पलीकडे दुसरं तंत्र नाही. पण भारतवर्षात बुद्धीचं स्वातंत्र्य अबाधित राखलेलं आहे. इथे गुरू- शिष्य परंपरा आहे, इथे देव भक्तांच्या परंपरा आहेत, पण देवाने भक्तावर अतिक्रमण केलेलं नाही आणि भक्त देवाच्या आहारी गेलेला नाही. तो स्वयं भक्त झाला आहे, देव झाला आहे आणि एवढंच नव्हे तर भक्त हा स्वतः परमात्मस्वरूप बनतो असा सिद्धांत भारतवर्षांचा आहे, असं तत्त्वज्ञान आहे.
Comentarios