विशालता
- shashwatsangati
- Apr 2
- 1 min read
लेखक: पू. बाबामहाराज आर्वीकर

मनुष्य चंचल असावा पण हनुमंतासारखा! माकडांचा तो स्वभावच आहे. पण रामभिमुख चांचल्य उदात्त भक्तिरसाचे महाकाव्य ठरते. कारण त्याचमुळे स्वभावसुलभ रामदास्य घडले. नाहीतर साधक हरिसन्मुख झाला की तो किंकर्तव्य होऊ लागतो. क्रोध असावा पण तो शिवरूपातून! ज्याच्या कोपात विषप्राशनासारखे मांगल्यही स्थिर आहे व सर्वसुखाचा त्यागही ज्याच्या ईश्वरनिष्ठेत आहे. मनाने भोग निर्माण करून भोगण्याचे कल्पनेतच जीव तगमगून दुःखी होतात. प्रेम असावे पण ज्ञानराजासारखे! ज्याचे प्रेमात आपले व्यक्तित्व लय पावते - निरागस, व्यापक विशाल असे सर्व-सहाय्य्यी निर्मळ प्रेम ज्ञानराजातच पहावे! निरागसतेमुळे निर्व्याजता, परोपकारशीलता , दयाळूपणा व कल्याणकारी प्रिय भावनांचा वापर; तर व्यापकतेमुळे कोणी कसेही असा, त्याला आपल्यात जिरविण्याची महानता येते. ज्ञानदेवांनी सर्व मते व सर्व संत आपल्यात साठविले! आपण व्यापावे यापेक्षा अनंत घटकांचे एकपण साधावे म्हणजे व्यापकत्व येते! विशाल हा शब्दच विशाल आहे की ज्यात कृपा, क्षमा, शांती व गांभीर्य सखोलतेने साठविलेले आहे. विशाल असावे श्रीहरिप्रमाणे की ज्याने जगातील सारेच बरे-वाईट शुद्ध व पावन पावन करून सोडले. निरागसतेत प्रेम हा स्थायी भाव आहे व्यापकतेत ज्ञान हा स्थायी भाव आहे व विशालतेत प्रेम, ज्ञान व कर्म हा स्थायी भाव आहे.
Comments