लेखक: पू. बाबामहाराज आर्वीकर

मानवी जीवनाची प्रदीर्घ यात्रा चालत असताना विश्वसापेक्षेतील परिवर्तनाचे उल्लेखनीय क्षण जीवनात चिरस्मृत्य असतात. उगवत्या क्षणाला नवीनपणे दिसणारे जग जुन्या स्मृतींची ठेवच आहे हा न्याय विस्मृत असल्यामुळे सारे जीव नवीन क्षणाला विचित्र जगाला नाविन्याच्या मोहकतेनी धरतात व पुढील क्षणाला जुने म्हणून सोडतात. हा सारा क्रमच जग सोडून वेगळे होण्याची मानवी स्वभावाची लालसा प्रगट करतो. म्हणून सारे जग मरणारे झाले. जग सोडण्याच्या दोन कल्पना आहेत. एक, सत्य किंवा अमर होऊन सोडणे, दुसरी असत्य, मरुन जग सोडणे. बहुतेक जीव 'मेलो म्हणजे सुटलो' असे समजणारे आहे. पण हीच भ्रमणा आहे. अमर होऊनच जग सोडले पाहिजे. नाही तर ते सुटत नाही. परिवर्तनाचा धर्म हाच नियम सांगतो. म्हणून जीवन विश्वनिरपेक्ष होण्याकडे न्यावे व नेत असताना जी परिवर्तने होतील ती कधीही जुनी न होणारी असतील व म्हणून आनंदी व अक्षय स्वरुपाची असतात. हेच दिव्यत्व असते व यातच जीवन सुखी होऊ शकते.
नोकरी व जीवन यांची फारकत ठेवावी. नोकरी हे जीवन व्हायला नको. नोकरी हा अनुसंगिक धर्म जाणावा. नाहीतर शेवटी पश्चाताप मात्र नशिबी येतो.
असामान्य असावे पण सामान्य समजावे. स्वामित्व असावे पण न्यायनिष्ठूरतेचे पांघरुण ओढावे. चातुर्य ठेवावे पण भोळसट दिसावे. मनुष्य ओळखावा पण बोलून दाखवू नये. व्याकूळ असावे पण वाकू नये व मनधरणी करु नये. पुष्कळ करावे पण क्रियाहीन नसावे. सर्वांत असावे पण निवांत रहावे. स्वतः हरावे पण सर्वांना जिंकावे. विकारात विहरावे पण निर्विकारपणे अक्रिय असावे. सर्वांना वश करावे पण आपण बद्ध नसावे.
Comments