प्रेमाचे खरे स्वरूप काय?
- shashwatsangati
- Mar 5
- 3 min read
लेखक: पू. बाबामहाराज आर्वीकर

देहतः माणूस माणसापासून लांब जातो, पण माणसाला ज्या गुणांनी माणूस समजले जाते ते जाणीवरूप मन मात्र सहवासीय स्मृति, लांब जाताच सतत चघळीत असते. आठवणींच्या स्वरूपात कितीतरी बऱ्या वाईट संवेदना, मानवी जीवनातील संबंध नित्य ताजे ठेवण्याचा प्रयत्न करीत असतात आणि याचमुळे जग सुटत नाही म्हणतात. जगाच्या संबंधात जसा विहार घडला तो साराच्या सारा स्मृति स्वरूपात जग व आपण यांचा संबंध नित्य नवीन ठेवणारा धागा ठरला आणि म्हणूनच भगवंतांनी अर्जुनाला बोध करताना अरे झाले ते शहाणे लोक आठवीत बसत नाहीत, ते मृतांचे म्हणजे झाल्या कथेचे चघळणे करीत नाही. (गतासूनगतासूंश्च नानुशोचन्ति पण्डिताः) असे म्हटले आहे. जगात कोणी आला व गेला ही वार्ताच खोटी व भ्रामक आहे. असा समज करून भूतकाळातील गत प्रसंग स्मरण न करणेच इष्ट !
वरील विधान जरी सत्य असले तरी घडलेल्या प्रिय, सुखद व दुःखद घटना विसरणे मानवी प्रयत्नांपलीकडील आहे. मृत्युच्या खोल खाईतही संवेदन स्वरूपाने पुढील जन्मी उगवणारे हे आठवणींचे मूळ, जिवंतपणीच्या प्रेम निर्झराच्या ओलाव्यात कसे सुकणार ? बुद्धि वेडी होऊन भ्रम झाला तरीही त्या स्मृति व्यक्तिसंबंध सोडून नेड्याच्या वेड्या लहरि बनून वेडसरपणाचा हैदोस घालीत असतात ! बुद्धिचा समूळ विनाश झाला तरी विशिष्ट संवेदनांनी फिरवला जाणारा प्राण अहंकाराचे नाना स्पंद रूपे नटवून जीवाला पुनःपुन्हा नटवितो. लांबचा प्रवासी गाडी बदलतो पण पुन्हा कुठल्यातरी गाडीतच प्रवास करतो. अपूर्ण अशी ही प्रवासवृत्ती सुरू झाल्यापासून त्याच्या बुद्धितील प्रवास संवेदन घरी जाईपर्यंत जसे असावे तद्वतच संबंधातील माणसे माणूस सोडू शकतो पण त्यांच्या आठवणी सोडणे अवघडच आहे.
तरीपण आठवणींमुळे होणारा परिणाम दुःखाला, पुनर्जन्मालाच कारण होय. घडलेल्या गोष्टी आठवणारच व माणसाची दुःखश्रृंखला बळकटच होत जाणार. काही आठवणी माणसाला आनंदी खऱ्या, पण त्याचमुळे पुनःपुन्हा तोच प्रसंग पुनरावृत्तीने घडत असतो आणि जेव्हा घडविणे कठिण वा असंभवच असते, तेव्हा मनुष्य नित्याची सवय व दुःखाचा वज्रलेप करवून घेतो. कारण घडलेले प्रसंग हे काळाच्या दाढेखाली प्रत्यक्षात रगडले जातात व त्यांची सूक्ष्म संवेदना मात्र पुढील काळात बुध्दिचे मंथन करून दुर्दैवाचा दुःखाग्नी पेटवीत असतात, की ज्यात मनुष्य जीवंतपणीच क्षणाक्षणाला आपले अनैसर्गिक व विनाशी बलिदान निरर्थक करण्याला अधीर व दुर्बलपणे समर्थ होतो. जो प्रसंग आपल्या जीवनात जेवढ्या प्रियतेचा तेवढीच त्याची स्मृती बलवान व तेवढाच त्या प्रसंगाच्या नाशात वा पुन्हा न घडण्यात आक्रोश आणि भयानक असे जीवन संगीय दुःख संगीत होय.
जगात अनेक वैभववादी, विलासी निर्माण झाले व भोगैश्वर्याने विलसत असतानाच काळाने त्यांची भोगस्थाने भंगून टाकली, नव्हे त्यांना ते भोग व ती माणसे पुन्हा भेटू दिली नाहीत. राजा भर्तृहरि हाय पिंगला असा आकाशाला रडविणारा आक्रोश करीत होता. पण हाय! त्याच्या या आक्रोशाचा अंत त्याच्या दुर्बल व वेडसर पौरूषत्वांत झाला. पिंगला परत येऊ शकली नाही. अर्थात गत जन्मीचे पुण्यप्रतापाने त्याचा भाग्यसूर्य गोरक्षनाथही त्याचवेळी तिथे आले व त्याचे हे वेडे विलाप नैराश्याच्या वनात होत असताना पाहून, जगाच्या अंताबाहेरील सत्याची त्याची मिणमिणती ज्योत त्यांनी प्रज्वलित केली व त्याला ती ईशप्रेमाने झगझगीत करण्याचा आदेश दिला व मग या कटू व भीषण प्रसंगाचा अंत वैराग्याच्या प्रक्षिप्त शिखेवर जळू लागला. जो प्रसंग त्याला गोड, मादक व मधुर अशा आठवणींचा वाटत होता की ज्यात समूळ दुःखाचे महाबीज साठविले आहे, तोच प्रसंग वैराग्याच्या जळत्या प्रकाशात दुर्बल, उदास व किळसवाणा असा अज्ञानविवश भासू लागला.
जगात गोपीचंद व भर्तृहरि यांसारखे उदात्त एवं निर्मळ प्रेमीकही मिळणे कठीणच. मायेच्या रत्नांकित महालांत निरागस प्रेमास्तव खरेपणाने बलिदान करणारे ते नरवीर होते. त्यांना फक्त प्रेमाचे खरे स्वरूपच आकलन झालेले नव्हते. त्यांना सत्यदृष्टीचीच गरज होती. ती मिळताच सर्व भोगांचा, मानाचा आणि महत्तेचा वाळू लागलेला कपडा झटकावा तसा त्याग करून ते ईशरत झाले.
असो. या मायावी मनाने ज्या आठवणी जतन करुन ठेवाव्या त्याच मरणोत्तर व मरणाआधी केवळ विरह व दुःखच निर्माण करीत असतात. ह्या आठवणी कशा सोडाव्यात. हे घडणे तर भीष्मरुपच आहे. तथापि भगवंत म्हणतात, गड्या, आठवण सोडणे शक्य नव्हेच पण जी आठवण मृत्यूकाळी तुला होईल तसाच जन्म तू घेतोस. म्हणजे मृत्यूकाळी आठवणच श्रेष्ठ पण ही आठवण जर योग्य व आनंदाची असेल तर तू मूक्त होतो. यास्तव शेवट प्रत्ययाला येणारी गोष्ट ही सातत्याचे प्रवाहीपणच असते. जसा प्रवाह असेल तसाच पुढे साठा होतो. सागराचे वाहणेच नदी होय व नदीचे थांबणेच म्हणजे आपणात साठणे सागर होय. वृक्ष आपणातच साठतो म्हणून अनंत वृक्षबिजे त्यात उगवतात तद्वतच शेवटची आठवण पावन व्हावी, महान व्हावी यास्तव अर्जुना नित्य स्मरण एकाचेच ठेव. ते हरिचे जर करशील तर शेवट हरिपदालाच जाशील.
म्हणून आठवण देवाचीच ठेव. मायावी मनाचा, ज्ञान व विवेक या गुणांनी उपयोग करुन घे. मरणाऱ्या जगाची आठवण कर. चिरंतन आनंददायी अशा भगवंताची सतत आठवण कर. आठवणीत रडावे पण रडण्यात आनंद असावा. त्यात शोक उगवायला नको.
Comments