top of page

दसऱ्यात शमीवृक्षाचे महत्व

लेखक: पू. बाबामहाराज आर्वीकर



आपल्या संस्कृतीचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. दसऱ्याच्या दिवशी आपटा वा कांचनपत्राचे जसे महत्त्व तसे शमी वृक्षाचेही आहे. आपट्याचे महत्त्व सामाजिक तर शमीचे महत्त्व ऐतिहासिक. आपटा ते शमी अशी सामाजिक व ऐतिहासिक मूल्यांच्या संधीने जोडलेली, सामाजिक उत्क्रांतीकडे नेणारी मोठी मंगल वाट द्रष्ट्यांनी निर्माण केली. प्रथम शमीचे ऐतिहासिक रूप सांगून मग या दोघांच्या संधीत समाजकल्याणाचा मधुर मंत्र कसा गुंफला आहे हे सांगतो.


शमीचे पौराणिक महत्व म्हणजे रामाद्वारे रावण वधाची घडलेली घटना! म्हणूनच त्या दिवसास विजयादशमी - विजय प्राप्त करून देणारी तिथी म्हणत असावे. रावण म्हणजे आपला अहंकार होय. या अहंकाराचा सर्व कारभार आपल्याच दहा इंद्रियांच्याद्वारे चालतो. शरीर ही लंका, अहंकार हा रावण, इंद्रिये ही त्याची प्रधान मंडळी, मन हे त्याचे पंतप्रधान असे रूपक डोळ्यासमोर आणावे. हात, पाय, उपस्थ व गुदा ही कर्मेंद्रिये व त्वचा, डोळे, कान, नाक व जिव्हा ही ज्ञानेंद्रिये. अशा दहा इंद्रियांद्वारे अर्थात पंचविषयात अहंकार वावरत असतो. या अहंकाररूप रावणाने या इंद्रियांद्वारे बुद्धिस (सीतेस) आपल्या ताब्यात ठेवले. रामायण अशा प्रकारे चालू झाले. या बुद्धिरूप सीतेस रावणाच्या तावडीतून सोडविण्यासाठी 'राम' म्हणजे आपला 'आत्मा' प्रयत्नशील आहे. म्हणूत रामरायाने 'हनुमंत' (आपले प्राण) यास हाती धरले. प्राणावाचून सारी इंद्रिये मृतच आहेत. अहंकारास जर जिरवायचे तर इंद्रियांना प्राणशक्तिद्वारे आवरले पाहिजे. अर्थात हनुमंताने वासनेद्वारे (विकार, वासना, भावना) इंद्रियांना म्हणजे रावणाच्या मुख्य मंडळींना हैराण केले. मृत इंद्रियांचा वापर अहंकार करू शकत नाही. इंद्रिये ही मृत अर्थात हनुमंताच्या ताब्यात आहेत. ते सिद्ध झाल्याबरोबर रावण निष्प्रभ, शतबल होतो. मग रामशक्तिच्या प्रहाराने रावण 'अहंकार’ सहजच मरतो. अर्थात या कथेवरून काय कळते? दहा इंद्रियांच्या द्वारांनी रामाने (आत्म्याने) रावणावर (अहंकारावर) विजय मिळविला. एकूण राम रावण युद्ध प्रत्येकाच्या जीवनात नेहमीच चालू आहे. रामाने रावण वधून सीता सोडविली, आपण अहंकार पचवून आपली बुद्धी मुक्त केली पाहिजे. दहा इंद्रिये ही रावणाची (अहंकाराची) दहा तोंडेच होत. दहा म्हणजे दशमीद्वारे विजय संपादन करणे. हाच दसऱ्याचा पूर्ण मुहूर्त होय. म्हणून दसऱ्यास विजयप्राप्तीसाठी निर्धार, प्रतिज्ञा करण्याचा प्रघात आहे.


आता ऐतिहासिक कालाचा विचार करू. पांडव अज्ञातवासी होते. विराट नगरीत ते राहात होते. याच वेळी त्यांचा अज्ञातवासाचा काळ संपत येतो. कौरव या प्रसंगी विराटाच्या गायी पळवितात. विराटपुत्र उत्तरा त्यावेळी बढाई करून असे बोलतो की सारथी नसल्यामुळे मी कौरवांशी लढायला जाऊ शकत नाही. इतःपर मी त्यांना केव्हाच जिंकले असते. बृहन्नडा वेषात असलेला अर्जुन ते ऐकतो. त्याचा क्षात्रभाव जागा होतो. आपण सारथ्य करण्यास तयार असल्याचे तो उत्तरास बोलतो. उत्तरास ही संधी बरी वाटते. स्त्री वेषातील अर्जुनास न ओळखून तो तिच्यावर प्रेम करीतच होता. यामुळे तो म्हणतो, तू स्त्री आणि सारथी. तो हसतो. पण पुढे म्हणतो की ठीक आहे. प्रसंग आल्यावर कैकेयी दशरथासोबत युद्धात गेलीच होती ना? तशीच चल. दोघेही युद्धासाठी निघतात. रथ हाकण्याचे त्या स्त्रीचे (अर्जुनाचे) कौशल्य पाहून उत्तर चपापतो. त्याला त्या सुंदर स्त्रीचे कौतुक वाटते. युद्धापेक्षा तो तिच्याशी लगट करतो. पण स्त्री वेषातील अर्जुन शांत असतो. कौरवसेना दिसू लागते. ते पाहून उत्तर घाबरतो. रथ माघारी वळव म्हणतो. अर्जुन ऐकत नाही. उत्तर चिडतो. रथ सेनेसमोर येतो. शेवटी अर्जुन उत्तरास म्हणतो की हे बघा, तुम्हास युद्धाचे भय असेल तर सारथ्य करा, मी यांच्याशी युद्ध करते. उत्तर थक्क होतो. याच वेळी अर्जुन रथीन होतो, उत्तर सारथी होतो आणि जेथे अज्ञातवास घेताना पांडवांनी शस्त्रे लपविली होती तेथे त्या शमीवृक्षासमीप रथ घेण्यास अर्जुन उत्तरास सांगतो. रथ शमीवृक्षाजवळ येतो. अर्जुन उतरतो. शमीवृक्षावर चढतो. एक ढलपा काढतो. आतील शस्त्रे घेऊन रथावर चढतो. युद्ध होते. अर्जुन विजयी होतो. एकूण अज्ञातवासही विजयश्रीने संपवून अर्जुन परत येतो. जीवाचा या विराटस्वरूप जगात अज्ञातवासच असतो. तो कौरवांशी लढूनच संपवावा लागतो. एकूण दसऱ्याचे दिवशी अज्ञातवास संपवणे, दुष्ट दमनाचा प्रयत्न करणे ही गोष्ट या कथेतून स्पष्ट होते. आपट्याच्या दर्शनात जीवाजीवांनी एकरूप व्हावे हे स्पष्ट करून सर्वांनी मिळून पुढे जगातील दुष्टता, पापमयता दूर सारावी हाच या कथेचा व दसऱ्याचा आशय आहे. सर्वांनी एकदिलाने वागून (मग ते उत्तरासारखे दुर्बल वा अर्जुनासारखे सबल कोणीही असो) कौरवांचा अर्थात दुष्टतेचा नाश केला पाहिजे. यासाठी अज्ञातवासात शमीवृक्षावर अर्थात सहिष्णुता वा शांति स्वीकारल्यामुळे लपलेले आपले सामर्थ्य, शस्त्रे बाहेर काढावी व कार्य साधावे. एकूण सर्वांनी मिळून, एकत्र येऊनच दुष्टसंहार व समाजहित साधावे, हा समाजनिष्ठ संकेत दसऱ्याचे आपटा व शमी याचे महत्त्व सांगतात.


यात एक सुंदर अध्यात्म विचारही आहे. जीवाने शमी अर्थात शांतिच्या, तुष्टीच्या आश्रयाने असलेले आपले सामर्थ्य वापरून कौरव, वासना जिंकाव्या. हाच तो अध्यात्मिक विचार होय. पुढे दिवाळी आली. दसऱ्यानंतर दिवाळी स्वाभाविकच. विजयानंतरचा आनंदोत्सव म्हणजेच दिवाळी. दिवाळी हे समृद्धीचे व ज्ञानाचे प्रतीक आहे.

 
 
 

Comments


Terms & Conditions

Privacy Policy

Accessibility Statement

©2035 by Shashwat Sangati. Powered and secured by Wix

bottom of page