जग देवरूप नाही पण देव मात्र जगरूप झाला आहे.
- shashwatsangati
- Apr 9
- 3 min read
लेखक: पू. बाबामहाराज आर्वीकर

जगाला ईश्वर समजा असा समज रूढ आहे. पण व्यवहारतः हे जुळणे शक्य नाही. लोक मात्र बुद्धीने सारेच देवरूप मानून पोकळ गप्पा करतात व व्यवहार आणि जीवन अलबत् या विचारांच्या विरूद्ध दिशेने साधीत असतात. वास्तविक हा विचार म्हणजे स्व-वंचनाच आहे !
म्हणून ज्ञानेशांनी व सकळ संतांनीही ईश्वरच सारे आहे असे जाणा असे सांगितले. जग देवरूप नाही पण देव मात्र जगरूप झाला आहे.
जसे नदी पाणीरूप आहे (कारण आटणे व वाढणे हे पाण्याचे धर्म नाहीत तर ती स्थलाभावी कल्पना आहे) नदीला नदीचे एक स्वतंत्र रूप आहे. पण पाणी मात्र नदीरूप असतेच. पाण्याची अनंत रूपे आहेत. पण नदीचे एकच रूप आहे. ते तिला बदलता येणार नाही. तिचे रूप जर बदलले तर ती नदीच राहणार नाही. पण पाणी नदीरूप काय सागररूप, धारारूप, तरंगरूप, बिंदूरूप, सरोवररूप, तळेरूप, भांडेरूप, घागररूप काय हवे ते रूप पाण्याचे होते. तद्वत् भगवंताचे आहे. म्हणून तुम्ही प्रथम पाणीच जाणा. तरच नदीचा खराखुरा उपयोग तुम्ही सुखास्तव करू शकता. म्हणून तुम्ही प्रथम प्रभूच ओळखा व मग जग आपोआपच प्रिय होईल. देवाचे लीलया सजणे म्हणजेच जग हे तुम्हांस कळेल.
जसे झाड, फुले, फळे यांचे असते तसे ! पाने, फुले, फळे वेगळीच असतात व ती तशीच राहणार ! ती कधीही एक होणार नाहीत. त्यांना फक्त त्यांच्या मूळरूपातच एक होता येईल आणि ते म्हणजे प्रकाशरूपात ! पण हे प्रकाशरूप
बीजरूपाने उगवेल, गंधरूपाने वाहते होईल. त्याचाच रस झाला व तो हळूहळू बीजशक्तीने व निसर्गाच्या न्यायाने वर उफाळू लागला. रसाने रसालाच वेढले. त्याने आपणच आपली मर्यादा केली. ही मर्यादा त्या बीजशक्तीने गतिरूप होऊन स्थिर केलेली असते. पुढे खोड झाले, खोड वाढू लागले, खोडामधूनच डाहाळ्या फुटू लागल्या. पण या डहाळ्या म्हणजे तरी काय असते ? खोडात दाटलेला रस सांडला पण तो रस खाली न सांडता, आपल्या रसावर सांडला व डाहाळीचे भाग घडू लागले. जसे शक्तिनिर्माण चालू आहे पण गती थांबवली तर मशीनची चाके जागीच फिरतील, तद्वत् रस वाहता वाहता मर्यादेतून उलटला व मग तो पानांच्या रूपाने प्रवाही झाला. हा प्रत्येक क्रम गतीच्या मर्यादेवर रस आदळून आपटून मुळाकडे वळतो व मुळांतून सारखा रस वर फेकला जातो. तेव्हां हे दोनही रस परस्परांच्या भेटीत गतिसाधर्म्य पण दिशाविरोध व गुणविरोध यामुळे आवर्त निर्माण करून तिसराच पदार्थ निर्माण होतो. असा आवर्त फळाच्या अवस्थेपर्यंत उर्ध्व धर्माने प्रकट होतो व शेवटी फळ पिकते व ते खाली पडून आपल्या मूळ रूपाकडे येते. वास्तविक सारा वृक्ष वर वाढताना दिसला तर पर्यायाने त्याचीअंतिम अवस्था खालीच येत असेल तर तो खाली वाढत होता हे न्यायतः सिद्ध होते. वृक्ष आपल्या मुळातच लय पावून अदृश्य अवस्था प्राप्त होते. कालचा वृक्ष आज नाश झाला म्हणजे आज मुळाकडे आला. फळरूपाने तो मूल झाला व वृक्षरूपाने तो संपला. तथापि वृक्ष दिसतो तर त्या वृक्षाची अवस्था अनंत वृक्षांच्या दशेने आपण पाहतो. पण आपण जाणतो एकच की कालचा वृक्ष आज नाही, आजचा उद्या नाही आणि असे असूनही त्याला आपण वाढण्याच्या मापाने मोजून आयुष्याच्या कालदशेत लक्षात घेतो आणि त्याचे खरेखुरे स्वरूप विसरतो !
तद्वतच भगवंताचे हे लीलामय प्राकट्य आहे. पण ती मूळ अवस्था ध्यानी न घेता, प्राकट्याचे आयुर्मान ठरवून आपण जन्ममरणोपाधीत सारे जग आणतो.
आणि म्हणूनच संतांनी सांगितले की मानवा तू जग जाणण्याचे सोड. जगाला देव समजत बसू नकोस. जो मूळ देव आहे त्याचेच स्वरूप तू जाणून घे. तो कळला की मग जग यथार्थाने कळेल व माझा हरीच साऱ्या सृष्टीत लीला करतो असे तुला भासेल. मग जगाचे आयुष्य नाही, आपले आयुष्य नाही, तर आपल्या आकाराने देव प्रगटला व देवातच अंती लय पावला. पण हे पुरातन शाश्वत तत्त्व कसे आकळावे ? त्याकरिता तू सरळ मनाचा हो. कुतर्क व शब्दचावटी सांड व माझ्याबरोबर खेळू लाग. माझ्यासाठीच कर्म कर, माझ्यासाठीच खा-पी झोप बोल-वाच-धाव सारे सारे माझ्यासोबत माझ्याकरिता कर. सर्वतः मलाच भज म्हणजे मी तुझ्या हृदयात प्रकट होईन व तुला कळेल की तूच तो देव आहेस. माझ्या स्वरूपबोधाने सारे दृश्यमान मद्रूप होईल व प्रत्यक्षात माझेच रूपडे म्हणजे हे जग असे तुला कळेल. मग मात्र व्यवहार व जीवन आणि मी, तुला वेगळे ठेवता येणार नाही. मग तुझा आनंदच माझा व मीच तुझा आनंद असे होईल.
यासाठीच नाम घ्या, पूजा करा. हे सारे प्रेमाने, निष्ठेने, अर्पणबुद्धीने, शरणागतीने केले तर जग व देव यांचा यथार्थ साक्षात्कार होऊन, जीवन प्रभूच्या प्रेममय पुढ्यात निर्भय, निर्धारित व सुखरूप होते. विचार कठीण आहे तर आचार किती सूक्ष्म आहे हे जाणून घ्या. तथापि संतांनी विचाराचा आचार कर असे सांगितले नाही, तर विश्वासाचा आचार कर व प्रेमाचे- भावाचे स्पंद उठव. प्रभुकृपेने वा संतकृपेनेच हे शक्य आहे. विचारच प्रयोग करणे हे जगात चुकीचे धोरण आहे. खरे म्हणजे प्रभूच्या कृपेने वा संतकृपेने देवाचे प्रेम लाभते व मग पूजन सुरू होऊन जीव शरण होतो व पुढे आनंदलहरींनी उर्वरित विचाराचे जीवन प्रतिष्ठापन्न होते. यासाठीच पूजा, नामजप ही साधने आहेत. कल्याणमस्तु !
Comments