लेखक: पू. बाबामहाराज आर्वीकर
जगण्याच्या प्रत्येक क्षणात आनंदाच्या स्फूरणेचा क्रियोद्भव असतो. जगायचे आहे असे समजून मनुष्य व्यवहार वा तद्सापेक्ष क्रिया करतो, की ज्याचा परिणाम न कळत मृत्यु हा आहे. वास्तविक आनंदाकरिता करावे, सजीवतेकरिता करावे हा धर्म घेऊनच कृति करीत असताना परिणाम मात्र विरूद्ध अनुभवायला येतो. सुख दुःखांचे अकल्पित द्वंद्वच जगाच्या बाजारात अनुभवाला येते. अनंत जन्मांच्या बऱ्यावाईट कर्मांचाच हा परिणाम असतो. त्यात याहि जन्माचे प्रयत्न फलित सुप्ततेने जिवंत असतेच. म्हणजे विश्व एका नियोजित कर्मप्रवाहात स्थिर झालेले आढळते. या कर्मचक्राबाहेर जाण्याची मंगल वाट तरी कोणती? असा प्रश्न डोळ्यासमोर ठेऊन सर्वांची धावपळ आहे. स्वाभाविक निरामयतेकडे व नित्यानंदाकडे सारेच जाताहेत. पण अदूरदर्शित्व व अहंकार यामुळे ते कर्मचक्र चक्रव्यूह होते. अभिमन्यूची गोष्ट या संदर्भात फारच गोड वाटते. कौरव पांडवांच्या युद्धात जयद्रथाचा चक्रव्यूह फोडून आत जाण्याचे ज्ञान त्याला होते पण बाहेर कसे पडावे हे माहित नसल्यामुळे बिचाऱ्याला अपमानीत होऊन काळाच्या स्वाधीन व्हावे लागले. वास्तविक तो श्रीकृष्णाचा भाचा व पांडवांचा मुलगा होता. हीच गत आपली आहे. आपणही त्या देवाचे वंशज आहोत. आपण निर्माण झालो तेव्हा त्याचेचकडून कर्मचक्राचा भेद करून आत कसे जावे हे शिकलो, पण अधीरपणाच्या दोषामुळे कर्मव्यूह फोडून बाहेर येणे अवघड झाले. शेवटी सारे करूनही इच्छा नसताना अपमानित होऊन काळाच्या स्वाधीन होणे भाग पडते. असा हा हपापलेल्या जीवदशेचा कर्मव्यापार आहे. पण आता हे सुटणार कसे? काय करावे की ज्यामुळे परमशांति मिळेल? असे कोणते कर्म आहे की ज्या कर्मामुळे कर्मफळांचाच नाश होईल? असे एखादे कर्म असणे संभवनीय आहे का? असा स्वाभाविक प्रश्न जीवापुढे उभा राहतो.
अहो, असे कर्मछेद करणारे कर्म नसते तर जीवांची जीवदशा कशी थांबली असती? आणि मग सुखाकडे जीवाने जावे असे म्हणता तरी आले असते का? म्हणून भगवंतानी याही कर्माचा उल्लेख करूनच टाकला आणि तो अशा पद्धतीने केला की, जीवाला काहीच श्रम घडू नयेत. ही केवढी दया! तो म्हणतो की अरे जीवा तू कर्म सोडू नकोस. प्रपंच खुशाल कर. खुशाल नश्वर आनंदात रंगून जा. पण एवढेच कर, की हे सारे करताना मला ते देऊन टाक. एक तर माझ्या प्रीत्यर्थच सारे कर वा सारे केलेले मला अर्पण कर. आता काय कठीण उरले आहे? तरी ते ऐकताच जीवाला दरदरून घाम सुटला. तो भ्याला. तेव्हा हरि परत म्हणतात की जीवा अरे घाबरू नकोस. हे बघ, स्वश्रमाचे मला देणे जर तुला जड जाते तर तूच ते घे. पण घेताना याचा भोक्ता मी नसून तो दयाळू जगदात्मा प्रभु आहे असा प्रामाणिक व दृढ भाव कर. असे नित्य करण्याने तू मलाच सर्व अर्पण करण्याचा अधिकारी होशील. एक गोष्ट आहे, ती सांगतो म्हणजे वरील गोष्टीचा उलगडा होईल.
एकदा सवंगड्यांसह चोरी करायला हरि गेले. जाताना नित्याप्रमाणे साधने नेलीच होती. पण आज त्यांना खटनटाकडे चोरीला जायचे होते. म्हणून त्यांनी सर्वांना सावध केले व काही सुचनाही दिल्या. सुचनाबरहुकूम सर्वांचे काम होते. पण वाकड्या म्हणून एक गोपाळ होता. त्याला वाटे की हरि हाच कोण सर्वांचा मालक? चोरी करावी आम्ही व नाव या कृष्णाचे घ्या, याचा जयजयकार करा हे काय म्हणून? बस झाले. अहंकारी विकल्प त्याच्या पोटात शिरला आणि चोरी आटोपून पळून मुक्त होण्याच्या वेळीच हा विकल्प दृढ झाला. देव म्हणतात की, अरे हे वर गवाक्ष आहे. या गवाक्षातून माझे स्मरण करीत तुम्ही बाहेर पडा. म्हणजे तुम्ही अडकणार नाही. पण अहंमन्य बुद्धीचा वृथाभिमानी थोडेच हे ऐकणार? त्या वाकड्याला वाटले की हा कृष्ण आपलेच मोठेपण दाखवतो. याच्या नावाने जर आम्ही बाहेर पडू शकतो तर आमच्या नावाला काय झाले? आमचे मोठेपण काय रेड्याचे थोडेच आहे? हाच कोण मोठा देव आला? झाले. शेवटी त्याचे कर्मच त्याला आड आले. चौर्यकर्म करून गवाक्षातून बाहेर उडी मारण्याचा जेव्हा तो प्रयत्न करतो तेव्हा तो गवाक्षातच अडकून बसतो. बाकी सारेजण कृष्णनामाच्या पुण्याईने त्या लहान गवाक्षातूनहि पार होतात. पण वाकड्याचे फक्त डोकेच तेवढे त्यातून बाहेर निघते व बाकीचे शरीर अडकून बसते. वाकड्याच तो. अहंकाराने ठिकठिकाणी वाकडा झालेला! थोडेफार डोके बरे होते तेवढेच फक्त बाहेर पडले ! कृष्णनामाच्या पुण्याईचे महत्व त्याला कसे कळावे ? अडकून बसल्यावर मात्र तो रडू लागला. आता सांगा, येथे देवांनी काय करावे? देवांनी युक्ति सांगितली होती व त्यानुसार सोबती पार झालेले समोर दिसत असतानाहि याचे वाकडेपण काही गेलेले नव्हते! तरी कनवाळू तो गोपालकृष्ण म्हणतो की अरे वेड्या आता तरी म्हण जय कृष्ण म्हणून! आणि मग नाईलाजाने, कष्टाने व तापाने होरपळल्यामुळे तो जय कृष्ण म्हणतो व मुक्त होतो. म्हणजे कृतकर्म बरेवाईट सारेच देवाला द्या म्हणजे तुम्ही मोकळे व्हाल. आहे की नाही सोपा उपाय ?
देव दयाळू आहे. सुख दुःख झालेच तर त्यांच्या स्मृतीत ते विसरावे व शेवटी असा पावन क्रम करीत देवाजवळ जावे. काय गोड व मंगल असेल तो काळ! प्रभुजवळ, त्याच्या ओटीत आपण झोपलेले आपल्याला जेव्हा पाहू तेव्हा कोण आनंद होईल!
Комментарии