माचणूर आश्रम
आत्मसुखाच्या प्रियत्वाने ऐहिक सुखांचा त्याग करुन विराट पुरुषाच्या दर्शनार्थ वाटचाल करणाऱ्या साधकांसाठी, एवढ़ेच नव्हे तर त्याचा दर्शनार्थ तळमळणाऱ्या प्रापंचिक मुमुक्षूंना काही काळतरी आपल्या साधनेसाठी निवांतता लाभावी यास्तव परमपूज्य श्री बाबामहाराज यांनी श्रीक्षेत्र माचणूर येथे ‘मोक्षधाम’ आश्रमाची उभारणी केली.

जाती, धर्म, पंथ, संप्रदाय निरपेक्ष पायावर ही उभारणी असून ‘सर्वात्मक श्रीगुरुदेव’ हे येथिल अधिष्ठान आहे, आणि ‘सहजता’ हे वैशिष्ट्य आहे.

पू. बाबा माचणूर कार्याबाबत म्हणतात:
“माचणूरचा मूलभूत सिद्धांत आम्ही असा ठरविलेला आहे की, विराट पुरुषाचे दर्शन जर करवायचे असेल तर अगोदर ‘जीवन’ समजले पाहिजे. साधु संतांनी आपले दोन्ही हात उभारून सांगीतले की अमृताकड़े पहा. तुम्ही अमर होऊ शकता, तुम्ही मुक्त होऊ शकता, तुम्ही सिद्ध होऊ शकता. सामर्थ्य मिळवायचे असेल तर त्या विराट पुरुषाचा परिचय करून घेतला पाहिजे. माचणूरची ही तात्विक बैठक आहे की आम्ही पुजारी आहोत श्रीगुरुंचे- त्या विराट पुरुषाचे!!
मी श्रीकृष्ण पूजन फार आनंदाने व प्रेमाने करतो, मला राम-कृष्ण आवड़तात. मी तेच माझे गुरुदेव समजतो. त्यांचे स्मरण होताच रोमांच उठतात आणि एक प्रकारची मस्ती चढ़ते, कारण ती भारतीय वेदना आहे. तुमच्या आमच्या आकरातून तो प्रकट होतो. कृष्ण, राम किंबहुना जे जे म्हणून अवतार झाले ते श्रीगुरुंचे आविर्भावच आहेत.
जी जी काही ईश्वराकड़े जाणारी मने असतील, माणसे असतील त्यांनी येथे एकत्र यावे, विश्वातील कमीतकमी गरजेवर अवलंबून असावे. स्व श्रमाजित अशा पद्धतीने जगण्याची त्यांची धारणा असली पाहिजे. याने त्याला श्रीगुरुंच्या पूजेसाठी, त्यांचे अवतरण घडविण्यासाठी भरपूर वेळ मिळेल.
साधना ही सहजगतिक अशी भावना आहे. देवाकड़े नेणारा वाट जर दिव्य आहे तर साधकाच्या प्रत्येक लहानसहान कृतीतूनही माणसातला देवच प्रकट झाला पाहिजे. माचणूरला निरंतर साधनाच असली पाहिजे.
आपला धर्मच मुळात साधना धर्म आहे. माचणूरला सहजगतिक साधना स्वीकारलेली आहे. इथे आम्ही सर्वच उपासना परंपरांचा स्वीकार केलेला आहे, कारण उपासना ही उत्स्फूर्त असते.
सज्जनता निर्माण करणे, साधुता निर्माण करणे हेच एकमेव मंगल कार्य आपल्याला माचणूरहून घड़वायचे आहे.”
