प्रात:स्मरण
सकाळचे उदयाबरोबर आत्मभानूचा उदय परिचयाला आणण्याचे हे जणू अमोघ मंत्रच आहेत. याचे पाठानें आपले स्वरूपाची जागृत वेदना दिवसाचे कर्म- व्यापारांत खेळेल व त्यामुळे सारा दिवस, प्रभूची मंगल आराधनाच ठरेल. तसेंच स्फूर्त झालेल्या पवित्र भावनांचा निर्मळ प्रवाह हा दिनकराचे अस्तमानावर विशुद्धतेनें समर्पित होईल व रात्रीचे प्रशांत निद्रेत पावित्र्याचा सागर भरतीला येईल. साधकांचे जीवनक्रमांतच साधना असावी लागते. केवळ कार्यक्रम करून जर जीवन प्रवाह तदनुरोधानें नसेल, तर सारे जीवन निराशावादीच होऊं लागेल. एतदर्थ, यांतील प्रभातीचे दिव्य स्फुरणेनें सर्व दिवस सुखाचे उर्ध्व- क्रमानें घालवून, रात्रीची विश्रांति स्वानंदानें व निरामय शांतीनें भरून टाकणें हा जीवनांतील एक आवश्यक कार्यभाग आहे.
जीवनाचे अंतरंगांत खेळणारें मन ज्या त्रिविध अवस्थेतून (जागृति, स्वप्न, सुषुप्ति) बागडतें, त्या भेदरूप न ठेवतां एकाच सुखसंवेद्यतेनें अभिन्न राखण्याची व्यवस्था या पाठामुळे होऊन जीव हा वरील तीनही अवस्थांना स्वानंदशीलतेनें भोगूं शकेल अशा तुर्यास्थितीचे महत्तम दान हा पाठ साधकांना निश्चित देईल, असें म्हणावयास हरकत नाहीं.
स्वात्मदीक्षा
धार्मिक* आचारांच्या जगात प्रवेशण्यापूर्वी अंतःकरणात परमार्थ विचारांचे जागरण होणे आवश्यक आहे. जीवन धर्ममय होण्यासाठी, परमार्थाच्या मंदिराचा विशाल रव करणारा तत्त्व-निनाद, प्रत्येक भावुकाने प्रथम ध्यानी घेणे उचित असते. असे न घडेल तर शक्य आहे की तुम्ही, "केवळ आचार - निष्ठेचे संकुचित स्तोम करणे हाच धर्म होय." असे समजण्याची परंपरानुगत चूक पुनश्च कराल. तरी अध्यात्म विवेकाने अंतरंग जागवा व मग पुढील आचाराने सारे जीवन विशाल व पावन करा. यासाठीच 'स्वात्मदीक्षा' प्रयोग आहे.
सायं प्रार्थना
हृदयाचा अंतर्गत प्रदेश स्थिर व्हावा, परमेश्वराचे स्मरण, भजन घडावे यासाठी प्रार्थना आहे. प्रार्थना करीत असताना सर्वव्यापक परमेश्वराला आपण का आळवतो हे कळण्यासाठी, प्रार्थनेत हृदय ओतले पाहिजे. त्यांसाठी काही संकेत हृदयात असावा. चितशक्तीचा आविष्कार व्हावा असा संकेत असावा. पोराच्या हाकेतील करुण हृदय आपल्यात असावे. त्यामुळे विकास होऊ शकेल. प्रेमपूर्ण निरामयता असल्यास परमेश्वराची अनुभूती येऊ लागेल. प्रार्थना हृदपटलावरील विक्षेप, आवरण दूर करते. अशी प्रार्थना झाली पाहिजे. प्रार्थना करणे नसून प्रार्थना झाली पाहिजे. प्रार्थनेत स्वाभाविक आविष्कार झाला पाहिजे. नाहीतर प्रभूचा संकेत कळणे कठीण ! परमेश्वराच्या संकेताची हाक आपल्या हृदयाच्या पवित्रपणाकरताच आहे. हृदय निर्मळ करणे हेच ध्येय असावे. प्रार्थनेमुळे विश्वातील अणूपरमाणूत व्याप्त असलेल्या परमेश्वराच्या अस्तित्वाविषयी, सर्व जीवांविषयी कळकळ निर्माण झाली पाहिजे. परमेश्वरीय अर्थ परमेश्वराच्याच कृपेने प्रार्थनेने प्राप्त होतो. सर्व हृदयांचे एकत्व प्रार्थनेतून होऊ शकेल. निकृष्ठ मन बदलून ते पवित्र व बलवान करण्याचे कार्य प्रार्थनेने होईल. परमेश्वराला आपल्या मनात स्थिर करण्यासाठी व त्याची शक्ती आपल्यात निर्माण होण्याकरीता प्रार्थना करावी.