पू. बाबा- व्यक्तिदर्शन

पू. बाबांचे रूपदर्शन अतिशय मनोहर असे. काळेकुळकुळीत केस, मानेवरून खांद्यापर्यंत पोहोचलेले व मागे फिरवलेले आणि स्वच्छ नीटनेटके असत. कपाळ रुंद, नाक तरतरीत, मिशा आणि दाढ़ी निगा ठेवून वाढ़वलेली असे. मुद्रा गंभीर, चिंतनशील तरी हसरेपणाला सतत सामोरी असे. आवाज मृदु असून घन, डोळे विशाल आणि सर्व अर्थाने देखणे असे होते.
शरीर बांधा ऊंच व सुदृढ़, पांढरी शुभ्र लुंगी आणि तशीच शुभ्र झुळझुळीत पैरण घातलेली असे. कधीकधी हरमूंजी मोतिया रंगाचे वस्त्र पू. बाबा डोक्याला गुंडाळत असत. वर्तमानात जगूनही मध्येच अल्याड पल्याड जाऊन यावेत असे वाटावे अशी आत्मतंद्रावस्था!!!
कृपाळूपणा, क्षमाशीलता, कारुण्य, प्रासंगिक कठोरता असे अनेक गुणविशेष पू. बाबांच्या सान्निध्यात अनुभवास येत असत. आपण कोणी इतरांपेक्षा वेगळे आहोत, संत, महात्मा, महाराज, गुरु असे कोणतेही वैशिष्ट्य पू. बाबांच्या विहारात नसे. कुटुंबात, समाजात एकमेकांशी जशी वागणूक असावी, तशीच त्यांची वागणूक असे. कोणाचे घरी गेल्यावर तेथे जशी व्यवस्था असेल त्याप्रमाणे ते समरस होत. सुखवस्तु कुटुंबातील गोड पदार्थ ज्याप्रमाणे सेवन करीत तसेच गरीबाचे घरी शिळा पदार्थ उरलेला असल्यास कोणी न सांगता स्वतःच शोधून काढ़ून सर्वांबरोवर आपणही खात. अनपेक्ष जीवन कसे असावे याचे प्रात्यक्षिक त्यांचे रूपाने वावरत होते.
कामाचे बाबतीत (ते लहानसे का असेना) ते सुयोग्य प्रकारे करण्यात व करवून घेण्यात त्यांचा कटाक्ष असे. टेबलवरील टाचणीसुद्धा इकड़ची तिकडे ठेवलेली त्यांना चालत नसे. प्रत्येक वस्तू जागच्या जागी ठेवण्याबाबत पू. बाबांची सूचना असे. ते म्हणत की नेटकेपणा हा परमार्थाचा मूळ पाया आहे.
पू. बाबा अतिशय मिश्किलही होते. प्रत्येकवेळी वेगवेगळ्या भावांचे, वेगवेगळ्या अवस्थांचे व विविध रुपांचे बाबांचे दर्शन घडे. ते खरे कसे आहेत, त्यांची नेमकी अवस्था कोणती याचा उलगडाच होत नसे. एकदा त्यांनी देवासमोर नृत्य कसे करावे याचा अभिनय करून दाखविला. एवढ़ा उंचापुरा धिप्पाड पुरुष देह परंतु लवचिक रबरासारखा वाक़त होता. हातापायाची हालचाल इतकी नाजूक व मोहक की टक लावून पाहतच बसावे. मुद्रा अभिनय तर एखाद्या निपुण मुद्रा नर्तिकेला लाजवेल असा! हे अभिनय नृत्य झाल्यावर पुन्हा निरागस मोकळेपणा! मी कोणी विशेष आहे किंवा मजजवळ काही अलौकिक कला आहेत याची गंध वार्ताही नाही.
पाण्याला कोणताही रंग चढ़वा त्याप्रमाणे कोणताही भाव पू. बाबा सहजगत्या धारण करीत असत. त्यांच्या भावलीला प्रसंगातून ते माणसांच्या जीवनाची दिशाच बदलवून टाकीत. अशी ही विशालता माचणूरक्षेत्री देहरुपाने खेळली, बागडली व विश्वाचा खेळ कसा असतो याची प्रचिती या महान संताने अनेकांना साक्षात दिली.
पुस्तक 'मी पाहिलेले बाबा' मध्ये बाबांच्या अधिक आठवणी वाचा.

