

जे स्वतःला व विश्वास नित्य अंतर्मुख आहेत व आपल्यातील होणाऱ्या सर्व फेरबदलांची कार्य कारण व्यवस्था जाणून घेतात, जे नित्य चेतनशीलतेसच अभिमुख असतात, त्यांचा मी मित्ररूपाने “सांगाति” असतो असे स्वयं सर्वसुखधाम भगवंत सांगत आहेत.
- श्रीसंत बाबामहाराज आर्वीकर
चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।
ह्या श्री ज्ञानेशांनी कथिलेल्या संतत्वाचा श्रीबाबांचे ठिकाणी नित्य जागर होता. महाराष्ट्र भूमंडळात एका नव्या धर्मजागरणाची प्रार्थना प्रभात त्यांचे करवी प्राचीकड़े आरक्त वर्णांकित सुचिन्हांनी मंडित झाली आहे. त्यांच्या दिव्यामृतधारा हया ग्रंथातील अमृतधारांच्या वर्षावामुळे शतकानुशतके श्रद्धाशील साधक वर्ग न्हाऊन आपापले अंगदोषांची सहज निष्कृति व श्रीगुरुचरणाची मधुरारती साधणार आहेत.
- प.पू श्री वामनराव गुळवणी महाराज
संत श्री बाबामहाराज आर्वीकर
पू. बाबांचे रूपदर्शन अतिशय मनोहर असे. काळेकुळकुळीत केस, मानेवरून खांद्यापर्यंत पोहोचलेले व मागे फिरवलेले आणि स्वच्छ नीटनेटके असत. कपाळ रुंद, नाक तरतरीत, मिशा आणि दाढ़ी निगा ठेवून वाढ़वलेली असे. मुद्रा गंभीर, चिंतनशील तरी हसरेपणाला सतत सामोरी असे. आवाज मृदु असून घन, डोळे विशाल आणि सर्व अर्थाने देखणे असे होते.
शरीर बांधा ऊंच व सुदृढ़, पांढरी शुभ्र लुंगी आणि तशीच शुभ्र झुळझुळीत पैरण घातलेली असे. कधीकधी हरमूंजी मोतिया रंगाचे वस्त्र पू. बाबा डोक्याला गुंडाळत असत. वर्तमानात जगूनही मध्येच अल्याड पल्याड जाऊन यावेत असे वाटावे अशी आत्मतंद्रावस्था!!!
कृपाळूपणा, क्षमाशीलता, कारुण्य, प्रासंगिक कठोरता असे अनेक गुणविशेष पू. बाबांच्या सान्निध्यात अनुभवास येत असत. आपण कोणी इतरांपेक्षा वेगळे आहोत, संत, महात्मा, महाराज, गुरु असे कोणतेही वैशिष्ट्य पू. बाबांच्या विहारात नसे. कुटुंबात, समाजात एकमेकांशी जशी वागणूक असावी, तशीच त्यांची वागणूक असे. कोणाचे घरी गेल्यावर तेथे जशी व्यवस्था असेल त्याप्रमाणे ते समरस होत. सुखवस्तु कुटुंबातील गोड पदार्थ ज्याप्रमाणे सेवन करीत तसेच गरीबाचे घरी शिळा पदार्थ उरलेला असल्यास कोणी न सांगता स्वतःच शोधून काढ़ून सर्वांबरोवर आपणही खात. अनपेक्ष जीवन कसे असावे याचे प्रात्यक्षिक त्यांचे रूपाने वावरत होते.
जोडले रहा!
आपला ईमेल अॅड्रेस आमच्याशी शेअर करा जेणेकरून जेव्हा नवीन ब्लॉग्स, पुस्तके आणि ऑडिओ उपलब्ध होतील, तेव्हा आम्ही आपल्याला अपडेट करू शकू!